Friday, July 15, 2011

सांज..!!..

साधारण दोन-अडीच तासांची निद्रा डोळ्यांच्या पापण्या्वरून पाण्याच्या मारलेल्या सपक्यांसोबत वाहून गेली अन मी रम्य अशा सायंकाळी मस्त वाफाळलेल्या उकळत्या चहा चे प्राशन करून जीव्हादेवीला तृप्त केले अन चालत निघालो..
श्री अरण्येश्वर देवालय - मोठा, शांत अन रम्य परिसर ! अरण्येश्वर (शंकर), विठोबा - रखुमाई , श्रीराम , हनुमंत , गणपती बाप्पा , कालभैरव अन श्री दत्त महाराज या सर्वांच वास्तव्य आहे या देवळात ! दर्शन आटोपलं. कट्ट्यावर दहा - एक मिनिट विसावल्यावर मी निघालो . देवळातून बाहेर पडलो.
रणरणत्या उन्हाच्या दिवसात आभाळात काळ्या ढगांनी तौबा गर्दी केली होती. वातावरण अगदीच romantic होत. आत्तापर्यंत रम्य वाटणारी संध्याकाळ आता एक "प्रेमवेडी सांज" झाली होती.

“नभांगणातल्या श्वेत अभ्रामागून येणारी रणरणती सोनेरी शलाका जेव्हा आल्हाददायक नारींग्या मध्ये रुपांतरीत होते तेव्हा या धरेच्या अंगणात अवतीर्ण होते ती - सांज !”

अन दिवसभर तापून निघालेल्या या धरतीवर आकाशातून पाण्याचा फवारा पडू लागला अन त्यात मी ही चिंब भिजलो . आणि असं सगळं वातावरण असताना काही ओळी स्फुरल्या शिवाय राहत नाहीत . अशावेळी खर तर आपलं प्रेमाचं माणूस जवळ असेल तर क्या बात है..!!.. ( प्रत्येकाजवळ प्रेमाच माणूस असतच. माझ्यासारखे तर बरेच असतील माझे मित्र - मैत्रिणी -“जिनके खयालोंमे सिर्फ अनदेखा - अनजाना चेहरा हर घडी हर वक्त आता है ” !—असो ).
दररोज अशीच संध्याकाळ जर प्रत्येकाच्या जीवनात आली तर प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास नव्या उमेदीने , नव्या उत्साहाने सुरु राहील यात शंका नाही . मानसिक ताण तर कुठल्या-कुठे पळून जाईल पत्ता लागणार नाही. तर त्या स्फुरलेल्या ओळींनीच लेखाचा शेवट करतो -

स्वप्नांच्या नभांगणात प्रीत जन्मली
धुंद गारव्यात अन पावसात न्हाली
प्रेमाच्या स्वप्नात सखे गुंतले मन हे वेडे
आसमंती मृदेचा गंध ओला शिंपडे
मेघ बरसला हा प्रेमाचा, अंग-अंग नाहवे
पावासातुनी पुकारतो मी ये जराशी माझ्यासवे
फिरे बेभान हा वारा सांगे प्रेमाचे गूज
यावीच नित्य अशी ही प्रेमवेडी सांज..!!..

No comments:

Post a Comment