Tuesday, May 24, 2011

प्रेयसी..!

दिवसा - रात्री आठवण येता
क्षणात मग ती येते
म्हणते- सख्या, मी तुझीच सोबती
अल्लद पापणी मिटवते

तिच्या कुशीत निजणे जणू की
स्वप्नांचा तो सुंदर गाव
खूप चिडते अन निघोनिया जाते
घेता मी चहा चे नाव

गोड गुलाबी थंडी मध्ये
ती गाते धनश्री-पूरिया
लख्ख गोरटी नार जणू की
नजाकतीचा दर्या

करते जवळीक इतकी जणू
ती राणी अन मी भूप
प्रेयसी ही जन्मांतरीची
नाव तिचे " झोप "..

Monday, May 23, 2011

फक्त तू..!

आज तुझी खूप आठवण येतेय
सारखा समोर येतोय तुझाच चेहरा
सत्य की आभास ? हा जीव बावरा
गोड लाजतेस अन हासतेस तू
लख्ख गोरटी नितळ नार तू
केव्हा भासतेस मोगरा अन केव्हा चाफा
आपोआप च अवतरतो मग
प्रेमभरल्या भावनांचा ताफा
नभातून बरसताहेत प्रेमाच्या धारा
थैमान घालतोय बेभान फिरणारा वारा
आसमंतात दरवळतोय मातीचा ओला गंध
अंग-अंगावर उठतोय प्रीतीचा शहारा
श्वासाला लागली आहे ओढ - फक्त तुझी
अन आहे माझा प्रत्येक श्वास - फक्त तुझ्याचसाठी

Sunday, May 1, 2011

एक अनोळखी चेहरा..!

या नयनांना कुणी अनोळखी चेहरा एक दिसला ग
आणिक झाले सुरु दिवस हे प्रीती अन प्रेमाचे ग
तरंग ऐसे उरात उठले कधीच पूर्वी नव्हते ग
कधी न भेटलो आधी तरीही मनास मन हे जुळले ग

काय करावे काही कळेना हाक कशी मी मारू ग
या नयनांना कुणी अनोळखी चेहरा एक दिसला ग

प्रथम पाहता चक्षुंनी या दोघे क्षणात हरवले ग
गालांवरती अश्रुधारा शरमेच्या त्या प्रेमाच्या ग
त्वचा कोवळी शहारली , हा गोड गुलाबी वारा ग
त्यास पाहता मनात माझ्या , वादळ वेडे उठले ग

अधरांवरती गीत उमटते , तुझ्या मनस्वी प्रीतीचे
लोचन भिरभिर चहूकडे , शोधत तुलाच फिरती रे
मैफिल रंगली सुरात सुंदर , तरीही काही हुरहुरते
हरवून जाशी कुठे तरी तू , मन हे वेडे घाबरते

सर्वस्वी ही माझी दुनिया , फक्त त्याचिया मिठीत ग
या नयनांना कुणी अनोळखी चेहरा एक दिसला ग ..

त्याला जाऊन खूप दिवस झाले ..!

पावसात भिजताना , विचार बरसू लागले
काय वाटले मनास माझ्या , सहज आकाशी पाहिले
बारीक चेहरा केलेले ढग , वाटले अश्रू च तयांचे वाहिले
पापण्या माझ्याही भिजल्या , त्याला जाऊन खूप दिवस झाले

मध्यंतरात अचानक रीळ उलटे फिरले
पहिली भेट त्याची अन रम्य दिवस आठवले
त्याच्या कवितेच्या प्रेमात मी , माझे गाणे त्यास भावले
मात्र आज हे सूर गहिवरले , त्याला जाऊन खूप दिवस झाले

आठवताच ती गोड भांडणे , मन हे हेलावले
भांडण मिटल्यावरी मिठीच्या स्मरणाने अश्रू नावरले
स्पर्श त्याचा , गंध त्याचा , मज पुन्हा पुन्हा आठवे
का उगीच मी जा म्हणाले त्याला , त्याने जगणेच सोडले ..त्याला जाऊन खूप दिवस झाले ..

अजूनही ..!

वाऱ्याची मंद झुळूक तुझे ते रेशमी केस उडवते का ग अजूनही ..??..
तुझा तो तलम दुपट्टा डोक्यावरून सरकून हळूच मानेवर उतरतो ..??..
तुझ्या केसातलं ते चाफ्या च फूल अजून तसाच घमघमाट देता ..??..
रात्रीचा धुंद गारवा शहारा उठवतो का ग अंग -भर ..??..
अन चंद्रा च ते टप्पोर चांदणं स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाता ..??..
सूर्याची ती कोवळी किरणं अजूनही पापण्यांना अलगद उचलून घेत असतील नाही ..??..
तुला पडणाऱ्या माझ्याच स्वप्नांमध्ये तू स्वतःशीच बोलतेस अजूनही ..??..
आपला एकमेकांकडे चोरून , लाजून अन हासून पहाणं आठवत तुला ..??..
शुभ्र कोऱ्या कागदावरती माझा चित्र काढायचीस तू ..
आणि त्याच्या कडे बघून गोड हसायचीस ..हो ना ..??..
खळखळून हसता हसता तुझ्या त्या अलवार पापण्या चिंब भिजतात का ग अजूनही ..??..
भर उन्हात ज्याच पांघरून माझ्यावर घातलस तो भरजरी पदर तुझ्या आसवांनी भिजत तर नाही ना ..??..
एका रिमझिम पावसात आपली भेट झाली होती आठवत ना ..??..
धो-धो बरसणारा पाउस बघताना मी तुझ्यावर केलेली कविता आठवते का ग एखादी ..??..
माझ्या सगळ्या आठवणी तुला आठवतात का ग अजूनही ..??..
तू म्हणालीस विसरून जा अन मी विसरलोही ..
पण लक्षात ठेवून आठवतेस तू मला ..अजूनही ..अजूनही ..!!..