Saturday, April 30, 2011

तुलाच पाहिले मी..!

डोळ्यात पाहताना स्वप्नास पाहिले मी
स्वप्नास पाहताना हृदयास पाहिले मी
हृदयास पाहताना प्रेमास पाहिले मी
प्रेमास पाहताना तुलाच पाहिले मी

अंधार पाहताना रात्रीस पाहिले मी
रात्रीस पाहताना चंद्रास पाहिले मी
चंद्रास पाहताना प्रेमास पाहिले मी
प्रेमास पाहताना तुलाच पाहिले मी

पाउस पाहताना कवितेस पाहिले मी
कवितेस पाहताना आठवणीस पाहिले मी
आठवणीस पाहताना प्रेमास पाहिले मी
प्रेमास पाहताना तुलाच पाहिले मी

गर्द हिरवा पाहताना बागेस पाहिले मी
बागेस पाहताना गुलाब पाहिले मी
गुलाब पाहताना प्रेमास पाहिले मी
अन प्रेमास पाहताना तुलाच पाहिले मी

लावणी..!

इष्काच्या या गाडीवरती
राजसा तुम्ही गाडीवान
धडधडतया काळीज माझं
का हो बनविली बंदिवान

रात झालीया , नींद आलीया
घ्यावा की लवकर मिठीत
नका दवडू वेळ वाया
चला वाड्याकड जरा घाईत

इष्काच्या पावसात मला
चिंब की हो भिजवा
चांदण्यात न्या हो मला
अन ताऱ्यांत अंगभर नाहवा..

स्वप्नांच्या दुनियेत फिरताना ..!

स्वप्नांच्या दुनियेत फिरताना
एक गोड परी समोर येते
स्वप्नांचा काही भाग
अचानक सत्यात उतरवते

भव्य -दिव्य राजवाडा
अत्यंत चोख न्याय -निवाडा
सुशिक्षित जनता सर्व
प्रत्येकाला आहे त्याचा गर्व

भ्रष्टाचाराला नाही वाव
एकत्र नांदते हर एक गाव
नाही सावकारीला थारा
आहे महत्व गरीब शेतकऱ्या

आता प्रत्येक धर्मामध्ये
नाही अजिबातच भांडण
सासरी जाताना प्रत्येक सून
नेते फक्त प्रेमाच च आंदण

पुन्हा समोर ती परी आली
खुदकन गालात गोड हसली
डोळे उघडताच जाणीव झाली
शक्यच नाही नगरी असली..

मृत्यूचा डोह.. !

टीप : पोरा -बाळांनी अन लेकी -सुनांनी टाकलेल्या एका म्हाताऱ्या बापाची ही हृदयस्पर्शी व्यथा ..

आज काल कोणाचाच भरवसा देता येत नाही
कधी नेतील काळीज पिळवटून सांगता येत नाही
किंमत कळेल त्यांना माणसाची तेव्हा
बाकी राहिलेली असेल शून्य जेव्हा

तोपर्यंत केला जातो माणसाचा सांभाळ
जोपर्यंत होत नसते त्याची आबाळ
केला जातो उपयोग त्याचा तो पर्यंत
संबोधला जात नाही “थेरडा ” जोपर्यंत

जहरी डोळ्यांचे हे बहिरी ससाणे
गहिरी नजर रोखून बघतात
लक्तरं -लक्तरं झालेल्या या देहाचा
ही गिधाडं फडशा पाडतील निमिषार्धात

नको नको वाटतेय ही मरणासन्न अवस्था
परमेश्वरा , का करतोयेस अशी कुचेष्टा
तुटले आहेत सारे पाश अन सुटले आहेत सारे मोह
आता खुणावतोय मृत्यूचा तो काळाशार डोह ....

वाढतंय प्रेम वाढू दे ..!

चाललंय ते चालू दे
होतंय ते होऊ दे
घडतंय ते घडू दे
वाढतंय प्रेम वाढू दे

झाड हिरव डोलू दे
पान सळसळ करू दे
कळी फुलतेय फुलू दे
वाढतंय प्रेम वाढू दे

नभ मेघांनी आक्रमू दे
नक्षी आकाशात उमटू दे
बेभान वारा फिरू दे
वाढतंय प्रेम वाढू दे ..

तू पुनवेचा चंद्रमा ..!

तू पुनवेचा चंद्रमा
तू माझी प्रियतमा
तू सूर्या सम तेजस्विता
तू वाटतेच मुली अपराजिता
तू पाण्यासारखी स्वच्छा अन नितळ
तू मेघातल्या विजे सारखी चंचल

गाल तुझे जणू गालीचा मखमली
त्यांवर ती भुलणारी खळी
भूलभूलैया सम ते कर्ण
ते नयन जे करिती या जीवा बेचैन

डोळ्यांसमोर आणता ते रूप
वाटे या जगाचा मी भूप
तुला पाहताच माझे राणी
आपोआप सुचतात मला ही गाणी ..

प्रेम पत्र .. !

प्रेम केलंय मी तुझ्यावर
जडला आहे जीव अन प्रीती
मन म्हणतंय सांग खुशाल
बुद्धी घालतेय भीती

सारखा सारखा समोर येतो
फक्त तुझाच चेहरा
अंगभर उसळतात लाटा
अन मनात खळखळ झरा

आनंदाच्या उकळ्या फुटतात
तू एकदा दिसलीस की
मन थुई -थुई नाचता
तू गोड हसलीस की

लगेच मुद्द्याला हात घालतो
मी तुला माझीच मानतो
तुलाही मी आवडतोच
अशी वेडी आशा करतो..

प्रेम ..!

प्रेमाला नसते व्याख्या ही
अन नसते उपमा ही
प्रेम असतं - निरनिराळी स्पंदने
प्रेम असतं – दोन जुळलेली मने

प्रेम असतं – आई ने भरवलेला मऊ भात
प्रेम असतं – बाबांनी पाठीवरून फिरवलेला हात
प्रेम असतं – प्रियकराने प्रेयसी वर केलेली कविता
प्रेम असतं – आजोबांच्या हातातली भगवदगीता

प्रेम असतं – निस्सीम भक्ती
प्रेम असतं – एक सशक्त शक्ती
मन जिंकण्याची , प्रेम असतं युक्ती
प्रेम असतं – निखळ मैत्री ..

पाउस ..!

रिमझिम रिमझिम या पावसात
आठवण दाटे तुझी मनात
कशा बरे सुचणार नाहीत मग कविता
ही अशी भाळलेली चांद -रात

हा सुसह्य गारवा
त्यानेच छेडील्या तारा
आठवतेय आपली पहिली भेट
असाच होता पाउस अन असाच उनाड वारा

आठवणी खूप गर्दी करताहेत
भावनांनाही आलाय पूर
प्रिये , जराशी लवकर च ये
सोबत चिंब भिजण्याची मजा च काही और..

नाते..!

आज खूप च वेगळे वाटत आहेत तुझे डोळे
वाटत आहे सांगू पाहतायेत सगळे
आज तुझा चेहरा जरा जास्त च सुंदर दिसतोय
मला फक्त तू च अन तुलाही मी च आवडतोय

आज तुझ मन जरा वेगळाच विचार करतंय..??..
आज आपल्या मध्ये असणारं हे नातं बदलतंय ..??..
उत्तर - तुला ही माहीत नाही अन मला ही
पण आज हा प्रश्नच मुळी उरत नाही

आज आपण नाही च आहोत या सृष्टीवर
आज आपण आहोत जणू सातव्या गगनावर
चल आज चिंब होऊ प्रेमाच्या या पावसात
आज वचन घेऊ - कायम राहू एकमेकांत

आज वेगळीच झालीये आपली दुनिया
वाटतोय मी सुलतान अन तू माझी रझिया
प्रेमाच्या या गावात कायम राहूया
प्रेमाची च गीते कायम गाउया..

कविता ..!

म्हणलं एकदा कविता करून बघावी
पण सुचेना , विषय घ्यावा तरी कोणता ?
मग म्हणलं कशाला विचारात पडता
चला , कवितेवरच करूया कविता

विषय ठरला असा तर वाटलं
म्हणलं शब्द लिहिले की झालं
लिहिण्यासाठी सुचावं लागत हे मात्र विसरलं
नकळत कवींसाठी कौतुक बाहेर पडलं

एक -एक शब्द दिसला उडत उडत येताना
हळूच येऊन आपापल्या जागी बसताना
या शब्दांनीच ओळ तयार झाली
वाटलं चला , सुरुवात तर झाली

मग दिसले विचार पळत पळत येताना
तौबा गर्दी करून मनात घर करताना
एक -एक विचार बाहेर पडू लागला
हळूच आपापला तो विस्तारत गेला

वाटलं चला , कविता पूर्ण झाली
म्हणलं चला , “बाप्पा ” ला दाखवू पहिली
तेवढ्यात शीर्षकाची आठवण झाली
अन पुन्हा “कविता ” च मदतीला धावून आली..

एकदा तरी प्रेमात पडावं ..!

आपलं माणूस ओळखता यावं
त्याने आपल्याला जवळ घ्यावं
एकाच शहाळयातलं पाणी दोघांनी प्यावं
एकदा तरी प्रेमात पडावं

एकाच छत्रीत चालत राहावं
प्रेमाच्या पावसात चिंब भिजावं
वाजलीच थंडी तर जरासं बिलगावं
एकदा तरी प्रेमात पडावं

एकमेकांना मनसोक्त बघावं
आनंदाला उधाण यावं
प्रेमाच्या पंखांनी उंच उडावं
एकदा तरी प्रेमात पडावं ..

आस ..!

ओठ तुझे हे कितीक सुंदर
जणू गुलाबाची पाकळी
कांती तव ही किती कोवळी
अंगावरती मखमली च ल्याली

चंद्रावर ही आहे डाग
गुलाबास ही काटे आहेत
जिकडे तिकडे सर्व दूर
फक्त तुझेच आभास आहेत

चेहरा तुझा जणू चंद्रा गोरा
हास्य तुझे आहे च खास
रहावीस तू निरंतर माझी
एवढीच एक “ आस”..